ठाणे : शिवसेनेत उभी फूट पाडुन उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार करत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना, धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर ठाकरे गटामध्ये मोठा असंतोष उफाळला असून आदित्य ठाकरे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मदारसंघातून निवडणूक लढवण्याचे थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
शिंदेंच्या गडाला सुरुंग : शिंदेंच्या गडाला सुरुंग लावण्याचे इरादे ठाकरे गटाने जाहीर केले असतानाच आता मनसेनेही या मतदार संघात 'तगडा' उमेदवार उतरविण्याचे मनसुबे रचले आहेत. मनसेचे अभिजीत पानसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उतरण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या 'कोपरी-पाचपाखाडी' मतदासंघातच अडकवून ठेवण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ठाकरेंसह काँग्रेसची 'ठाणे' वारी : शिवसेनेत फूट पडुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्याने ठाकरे गटाकडुन शिंदे यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडलेली नाही. गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे सपत्नीक तसेच आदित्य ठाकरे यांच्या समवेत दोनदा तर आदित्य चार वेळा ठाण्यात आले. ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवातही ठाण्यातून झाली होती. तर, काँग्रेसच्या राज्यभरातील शिर्षस्थ नेत्यांनी मेळाव्यासाठी ठाणे वारी केल्याने सर्वच नेत्यांचे शिंदे यांच्या ठाणे गडाला लक्ष्य केल्याची चर्चा रंगली आहे.
शिंदेंचा 'गड' अबाधित : ठाणे पूर्व कोपरी येथून पश्चिमेकडील वागळे इस्टेट परिसरापर्यंत पसरला आहे. या भागात भूमिपुत्र कोळी-आगरी बांधव, मराठी, सिंधी मतदारांसह उत्तर भारतीय आणि काही अंशी पंजाबी व मुस्लीम समुदायाचे नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे इथे जातीय समीकरणे विशेषतः उत्तरभारतीय मतदारांमध्येच जुळवली जातात. या मतदार संघात २० पैकी शिंदे गटाचे १६ नगरसेवक असुन उर्वरीत भाजपचे नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेतील सत्ता आणि त्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा प्रभाव शिंदेंना पोषक ठरत आला आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भाजप उमेदवाराचा ५१ हजार ८६९ मताधिक्याने दणदणीत परभव केला होता. तर, २०१९ मध्येही काँग्रेसच्या उमेदवाराचा ८९ हजार मतांनी पराभव केला होता.