ठाणे - लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद असतानाही अवैध बांधकामे आणि त्यांना लागणारी वाळू यांचा व्यवसाय सुरूच होता. लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळूची तस्करी सुरू होती. मात्र लॉकडाऊननंतर वाळू तस्करांनी राजरोसपणे डोके वर काढले आहे. अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. तहसीलदारांनी केलेले कारवाईमध्ये ८० लाख ९४ हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती, मिळालेल्या माहितीनुसार महसूल पथकाने मुंब्रा खाडी आणि खाडी किनारी सुरू असलेल्या वाळू उत्खननावर छापा टाकला, या कारवाईमध्ये महसूल पथकाने 3 संक्शन पंप, 3 बार्ज व 10 अनाधिकृत वाळू प्लॉट जेसीबीच्या सहाय्याने खाडीतच नष्ठ केल्या. तर खाडी किनारी असलेला 50 ते 60 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत 80 लाख 94 हजारांच्या घरात असल्याची माहिती महसूल पथकाच्या वतीने देण्यात आली आहे.
सुटी पाहून वाळूची चोरी
ठाण्यामध्ये अनेक वाळू तस्कर कार्यरत आहेत, त्यांच्यावर अनेकदा कारवाई देखील झाली. मात्र अद्यापही अवैध वळूचे उत्खनन आणि वाहतूक सुरूच आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करतात.