ठाणे - उल्हासनगरमध्ये फुटपाथ काबीज करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये २५ पेक्षा जास्त हातगाड्या आणि टपऱ्या तोडण्यात आल्या.
उल्हासनगर शहरातील नेहरू चौक, शिरू चौक, गोल मैदान परिसरात विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी मनपाकडे केल्या होत्या. या तक्ररींची दखल घेऊन मनपाच्या चारही प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे, अजय कुमार एडके, भगवान कुमावत, गणेश शिंपी आणि अतिक्रमण पथकाने कारवाई केली.
हेही वाचा - चले जाव..! डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या विरोधात किसान सभेची निदर्शने
या कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस बंदोबस्तात त्यांची समजूत काढल्याने हा विरोध मावळला. शहरात वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फुटपाथवर देखील स्टॉल, टपऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.