ठाणे - एका विवाहितेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या डोंबिवलीतील तरुणाने राजस्थानमधील तिच्या पतीला ठार मारण्यासाठी दोन शार्प शुटर गुन्हेगारांना सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने तिचा पती गोळीबाराच्या हल्ल्यातून बचावल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कमलेश शेषराव शिंदे असे पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आदित्य पन्नालाल जैन, (वय ४१ रा. गांधीपथ, जि. जयपूर, राजस्थान) असे गोळीबाराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.
दुचाकीवरून आलेल्या शार्प शुटर गुन्हेगारांचा गोळीबार -
जखमी आदित्य जैन, हे राजस्थान मधील अवधपुरी, गांधीपथ येथे १६ जून २०२१ रोजी त्यांची गाडी साफसफाईचे काम करीत होते. त्याच सुमारास दोन अनोळखी तरुण मोटरसायकलीवरून आले व त्यांच्यावर गोळीबार केला. आदित्य यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्यांच्या हाताला लागून ते गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणी राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील करणी विहार पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम ३०७, १०९, ३४ शस्त्र कायदा ३, २५ प्रमाणे अज्ञात हल्लेखोरांविरोधात दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
सुपारीबाज तरुणाला कंटाळून जैन कुटूंब मूळ गावी परतले -
गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली कि, आदित्य जैन हे त्यांची पत्नी व परिवारासह २०१८ ते २०२० या कालावधीत डोंबिवली येथे राहत होते. त्या दरम्यान डोंबिवली येथे राहणारा मुख्य आरोपी कमलेश हा नेहमी त्यांच्या दुकानात येत जात असायचा व आदित्यची पत्नीवर एकतर्फी प्रेम करून तिला त्रास देऊ देत होता. याच त्रासाला कंटाळून जैन कुटूंब परिवारासह राजस्थान येथे मूळ गावी राहणेस गेले होते.
मुख्य आरोपीला डोंबिवलीतून अटक -
एकतर्फी प्रेमात वेडापिसा झालेल्या कमलेशने विवाहितेचा पती आदित्य यालाच ठार मारण्याकरिता एका गुन्हेगाराला सुपारी दिली. त्यानुसार दोन शार्पशुटर गुन्हेगारांनी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर गोळीबार केला. या गुन्ह्याच्या तपासकामी २१ जून २०२१ रोजी राजस्थानमधील करणी विहार पोलीस ठाण्याचे पोलिसांचे एक पथक डोंबिवलीत आले असता कल्याण व उल्हासनगर गुन्हे शाखा कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने मुख्य आरोपी कमलेश याला सापळा रचून देवीचा पाडा डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी राजस्थान पोलीस पथकाच्या स्वाधीन केले आहे.