ठाणे - कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबीवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या इराणी वस्तीतून एका सराईत चोरट्याला अटक करण्यात खडकपाडा पोलिसांनी यश आले आहे. विशेष म्हणजे या गुन्हेगाराने आतापर्यत 56 गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहेत. त्याच्याकडून 21 गुन्ह्यातील लाखो रुपायांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अब्दुला संजय इराणी उर्फ सैयद (वय 22 वर्षे), असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
इराणी वस्तीत सापळा रचून चोरट्याला अटक
कल्याण, डोंबिवलीसह ठाणे मुंबई, नवी मुंबई तसेच परीसरात चेन स्नॅचींग, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडत होते. त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार खडकपाडा गुन्ह्यातील आरोपीचा हा इराणी वस्तीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
12 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
अटक आरोपीकडून एकूण 10 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 16 मोटारसायकल व 1 लाख 75 हजार रुपये किमतीचा एकूण 61 ग्रॅम सोन्याचे दागिने, असा एकूण 12 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खडकपाडा पोलीस तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय व परीसरातील एकूण २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या सराईत चोरट्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय व परीसरात एकूण 56 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या गुन्हेगाराला अटक करण्याच्या कामगिरीत खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर व तपास पथकाचे अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक मधूकर दाभाडे, पोलीस शिपाई विनोद चन्ने, अशोक आहेर, दिपक धोरात, सुरेश बडे, विशाल राठोड या पोलीस पथकाचा सहभाग होता.
हेही वाचा - नाल्यात पडून बाईकस्वाराचा मृत्यू; स्थानिकांनी लावला हलगर्जीपणाचा आरोप