ठाणे - एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची व मारण्याची धमकी देत, तिला एका उच्चभ्रू इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील बंद खोलीत नेऊन तिच्यावर 21 वर्षीय आरोपीने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील एका उच्चभ्रू गृहसंकुलात घडली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून रितिक मांजी (रा. खडकपाडा), असे त्या आरोपीचे नाव आहे.
रस्त्यात गाठून पीडितेला दिली धमकी
पीडित तरुणी नातेवाईकांना जेवणाचा डबा देऊन दुपारच्या सुमारास घरच्या दिशेने दुचाकीवरून जात होती. त्याच सुमारास कल्याण पश्चिम भागातील एका चौकात आरोपीने तिला रस्त्यात गाठून तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. याचाच फायदा घेत पुन्हा धमकी देऊन आरोपी तिच्याच दुचाकीवरून बसून तिला कल्याण पश्चिम भागातील एका उच्चभ्रू गृहसंकुलातील अकराव्या मजल्यावर असलेल्या एका बंद खोलीत नेले. त्यानंतर त्याने तिला आरडाओरडा करशील तर मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करुन घटनास्थळावरून पसार झाला होता.
घडलेल्या प्रकारामुळे पीडिता भयभीत
घडलेल्या प्रकारामुळे पीडिता भयभीत झाली होती. त्यानंतर घरी येऊन तिने तिच्यावर घटलेल्या अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर नातेवाईक तिला घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात गेले व तिच्यावर घडलेला प्रसंगाचे कथन महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.द.वि.चे कलम 341, 366 (अ) , 376 सह पोक्सो कायदाअंतर्गत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : एटीएसने दमणमधून ताब्यात घेतली व्होल्वो कार
हेही वाचा - सीसीटीव्ही : भटक्या श्वानांचा चिमुकल्यावर हल्ला