ठाणे- राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना आज ईडी समोर चौकशी करता हजर राहिले आहेत. त्यावेळी कार्यकर्ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाणे पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी पोलीस स्टेशनला भेट दिली.
मनसे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात आले होते. या सरकारने सुडाचे राजकारण सुरू केले आणि त्याचा फटका सामान्य कार्यकर्त्यांना बसतोय, त्यामुळे सरकारने हे सुडाचे राजकारण बंद करावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी तपासात सर्व सत्य समोर येईल, असे वक्तव्य केले होते त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम हटवा, सगळं सत्य बाहेर येईल, असा टोला लगावला आहे.
तसेच ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी अवाज उचलतो त्याचा आवाज दडपन्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे. त्याचबरोबर अशा वेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे राज ठाकरे सोबत त्यांचा परिवार गेला तर कोणी टीका करू नये. बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जीवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली असल्याचेही आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.
जो व्यक्ती या सरकारच्या विरोधात बालतो, त्याला सातत्याने ईडी, सीबीआई यांची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबला जातो, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.