ठाणे : शिवीगाळ करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाची दोन मित्रांनी मिळून महाशिवरात्रीला धारधार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील बालकंजी बारी शाळेजवळ घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून दोन्ही आरोपीना १२ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. पप्पू उर्फ पपडया जालीदंर जाधव (वय ३६ रा. बालकंची बारी, खेमानीरोड, उल्हासनगर) अमित रमेश पांडे (वय ३० रा. महालक्ष्मी प्लॉस्टजेट कंपनी, अंबरनाथ ) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. तर अशोक शामराव वाघमारे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धारधार शस्त्राने हल्ला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मृतकमध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाली होती. याचा राग मनात धरून आरोपीने अशोकला मारण्याचा कट रचला होता. त्यातच महाशिवरात्रीला रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील बालकंजी बारी शाळेजवळ ही घटना घडली. तीथे अशोक वाघमारे हा उभा असतानाच दोघा आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यातच अशोक वाघमारे यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते.
आरोपीला ताब्यात : अशोक वाघमारे खुन प्रकरणी १९ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांना गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा लागला होता. त्या आधारे पुणे येथील वाकड परिसरात आरोपी वास्तव्य करित असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर महाजन, अर्जुन मुत्तलगिरी, मिलींद मोरे, पिंट्या थोरवे, निलेश अहिरे या पोलीस पथकाने सापळा रचून पप्पू उर्फ पपडया या आरोपीला ताब्यात घेतले.
२४ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी : त्यानंतर दुसरा आरोपी अमित हा अंबरनाथ शहरात लपून बसल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अंबरनाथमधून ताब्यात घेतले. दरम्यान दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या कार्यलयात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता, दोघांनी खून केल्याची कुबली पोलिसांना दिली. त्यानंतर दोघांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली आहे. आज दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले असता २४ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.