ठाणे: एका घराचे छत अंगावर कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर या महिलेची मुलगी छताचा मलबा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण- मुरबाड रस्त्यावरील म्हारळ गावातील सूर्यानगरमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. रंजना उमाजी कांबळे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रज्ञा (वय १८) असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. रंजना यांची अन्य दोन मुले राज (१६), प्रीती (२०) दुसऱ्या खोलीतील झोपले असल्याने थोडक्यात बचावले आहे.
छताचा भोग कोसळून मोठा आवाज: मृतक रंजना ह्या म्हारळ गावातील सूर्यानगरपरिसरातील चाळीत आपल्या 3 मुलांसह राहत होते. त्या चाळीवर बांधकाम करुन त्यात रहिवासी राहतात. २५ वर्षापासुनच्या या भागात चाळी आहेत. छत कोसळले त्या भागात रंजना आणि मुलगी प्रज्ञा झोपले होते. शुक्रवारी पहाटे गाढ झोपेत असताना अचानक छताचा भोग कोसळून मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील रहिवासी जागे झाले.
मुंबईत उपचारासाठी हलविले: छताच्या राडारोड्याचा फटका रंजना यांना जोराने बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जवळ झोपलेल्या प्रज्ञाच्या अंगावर मलबा पडला. तिलाही जखमा झाल्या आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईत उपचारासाठी नेण्यात आले आहे. म्हारळ गावातील ग्रामपंचायत सदस्य नीलेश देशमुख, विवेक गंभीरराव, किशोर वाडेकर यांनी तात्काळ हालचाल करुन घरातील मलबा बाहेर काढला. आणि जखमी प्रज्ञाला मुंबईत उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
अशा घटना दरवर्षी: मृतक रंजना मजुरी करुन मुलांची उपजीविका करत होती. त्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. म्हारळ परिसरातील दगडखाणींमध्ये सुरूंग स्फोट केले जातात. त्याचे दणके चाळींना बसतात. त्यामुळे अशा घटना दरवर्षी घडतात, असे रहिवाशांनी सांगितले आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.