ठाणे - राज्य शासनाने गाय, तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतानाही चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गायीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे भिवंडीत वारंवार समोर आले आहे. असे असतानाच, पुन्हा भिवंडीतील नदीनाका येथे कत्तलीसाठी चारचाकी वाहनातून चक्क जिवंत गायींची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या समोर आला.
नाकाबंदीवेळी उघडकीस आली गायींची तस्करी..
भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलार-नदी नाका परिसरात तालुका पोलिसांनी ऑल आऊट मोहीम राबवून आज सकाळपासून नाकाबंदी केली होती. या नाका बंदीत एक टवेरा कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी अडवली असता पोलिसांना पाहून गाडीतील आरोपींनी गाडीतून उड्या मारून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, सर्वच आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरले. त्यांनतर पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीतील मागच्या बाजूच्या सीटमध्ये फेरबदल करून तीन जिवंत गायी ठेवल्याचे आढळले. या गायींमध्ये १० हजर रुपये किंमतीची पाच वर्षाची एक गीर जातीची गाय, एक दहा हजार रुपये किंमतीची जर्सी गीर क्रॉस जातीची ३ वर्ष वयाची गाय, तसेच एक १२ हजार रुपये रक्कमेची चार वर्ष गावठी गीर गाय, अशा एकूण ३२ हजार रुपये किंमतीच्या तीन जिवंत गायी आढळल्या.
पोलिसांनी सदर गाडी जप्त करून शेलार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून स्थानिकांच्या मदतीने गायींची सुटका केली. याप्रकरणी अब्दुल्ला मौला शेख (रा. नवी वस्ती) गुड्डू, नदीम, जमील तसेच गाडी मालक अशा पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय राजेंद्र बेरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुका पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहे.
पोलिसांनी गाडीतून संशयास्पद वस्तू घेतल्या ताब्यात...
पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीतून तीन मोबाईल फोन, तसेच अब्दुल्ला मौला शेख याचा वाहन परवाना, तसेच पॅन कार्ड, मतदार कार्ड व इतर ओळखपत्र, तसेच वेगवेगळ्या नंबर प्लेट व इंजेक्शन, दगडांनी भरलेली थैली, स्टीलचे रॉड, असे साहित्य जप्त केले आहे. गायींची गोशाळेमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाची लस आल्यास लोकप्रतिनिधींना ती प्राधान्याने द्यावी; ठाणे महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी