ठाणे : पाळीव प्राण्यांची बहुतांश जणांना खूप आवड असते. त्यामुळे घरातील सदस्यांप्रमणेच त्या पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जाते. इतकेच नाही तर त्यांचे वाढदिवसही साजरे केले जातात. असाच एक अनोखा वाढदिवस एका रेड्याचा साजरा झाला. त्याच्या वाढदिवसी अख्या गावाने मटणावर ताव मारला. जणू एखाद्या राजकिय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणेच वाजतागात पूर्ण गावाने जल्लोश केला.
अनेक झुंजी खेळून मिळवली प्रसिद्धी ..
शहापूर तालुक्यामधील सापगावातील सुरेश महादू अंदाडे यांचा हा रेडा आहे. त्याचे नाव रामू असे आहे. अंदाडे यांचे रामूवर खूप प्रेम आहे. तो झुंज खेळण्यात पटाईत असून त्याने आतापर्यत अनेक झुंजी खेळून पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे दरवर्षी ते या लाडक्या रामूचा वाढदिवस जल्लोषात साजरा करतात.
असा होतो रामूचा वाढदिवस ...
रामू रेड्याच्या वाढ दिवशी त्याला सजवले जाते, त्याच्यासाठी खास आवडते पदार्थ तयार केले जातात. खास केकही तयार केला जातो. एवढंच नाही तर पूर्ण गावाला चिकन-मटणची जंगी पार्टी दिली जाते. रात्री फटाक्यांची आतिशबाजी करून गावभर वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात जाते. अशाच प्रकारे याही वर्षी रामूचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या जल्लोषाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहेत.