ठाणे - गैरसोयी व सुविधांचा अभाव अशी ओरड असलेल्या भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या अभावी सर्पदंश झालेल्या एका आदिवासी मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सोई सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विठ्ठल देव कोरडा ( वय ५५ वर्ष , रा. जव्हार ) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या आदिवासी मजुराचे नाव असून तो आपल्या पत्नीसह भिवंडी तालुक्यातील कारीवली येथील एका बांधकामावर मजुरीवर काम करत होता.
पुढील उपचारासाठी नेण्याचा दिला होता डॉक्टरांनी सल्ला
कारिवली गावात गुरुवारी दुुपारच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मृतक मजुराच्या पायाला विषारी असलेला सर्प दंश झाला. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यास तत्काळ भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र त्यानंतर सायंकाळी मजुराची प्रकृती खालावल्याने त्यास पुढील उपचारासाठी कळवा व मुंबई येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, रुग्णाची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा - पिंपरीतील 14 सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; अॅपद्वारे ठेवणार लक्ष
..तर आमचा रुग्ण दगावला नसता
कामगाराच्या मृत्यूनंतर उपस्थित नागरिकांनी डॉक्टरांना 'तुम्ही रुग्णाची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. हाच सल्ला जेव्हा आम्ही रुग्णाला दवाखान्यात दाखल केले, तेव्हाच दिला असता तर, आमचा रुग्ण दगावला नसता,' असा आरोप या रुग्णासोबत असलेल्या नागरिकांनी रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांवर केला. त्यास प्रतिउत्तर म्हणून येथील कर्तव्यावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, 'रुग्णावर आवश्यक तेवढे प्राथमिक उपचार योग्य रीतीने करण्यात आले आहेत. मात्र, सध्या इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही. सर्व व्हेंटिलेटर हे कोविडसाठी वापरण्यात आल्याने तुमच्या रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही आणि त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी सदर रुग्णास आम्ही पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्याचा सल्ला दिला.' येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री डोंगरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा नाही
'रुग्णाला सर्प दंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र काही वेळानंतर रुग्णाचा बीपी वाढला व त्याला आकडी आली कदाचित त्याला ब्रेन हॅमरेजसारखा त्रास झाला असावा. ज्यात या रुग्णाचा मृत्यू झाला, व्हेंटिलेटरबद्दल बोलायचे झाले तर, नॉन कोविडसाठी सध्या रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा नाही. त्याचबरोबर व्हेंटिलेटर हाताळणारे तज्ज्ञ टेक्निशियनदेखील रुग्णालयात नाहीत,' अशी प्रतिक्रिया स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ, ठाण्याच्या मेंटल रुग्णालयात पुन्हा भरती