ठाणे - उल्हासनगरात एका मादी श्वानासह तिच्या पिल्लाला झाडाला लटकावून फाशी देण्यात ( Dog Hanged in Thane ) आल्याचा अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्राणीमित्रांनी हा प्रकार समोर आणला असून याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
घटनेला ८ दिवस उलटूनही आरोपीचा शोध सुरूच - उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास एका मादी श्वानाला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आले. ही बाब पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी एक मादी श्वान आणि तिचं लहान पिल्लू मृतावस्थेत आढळून आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी १७ मार्च रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी भादंवि कलम ४२९ सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेला ८ दिवस उलटून गेले मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून या मादी श्वानाला आणि तिच्या लहान पिल्लाला निर्दयतेने आणि क्रूरतेने कुणी मारलं? याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मण सारिपुत्र यांनी दिली आहे.
हेही वाचा - 3 School Children Drowned : ओढ्यात बुडून 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू