ठाणे - मद्यधुंद डंपर चालकाने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना भिवंडी तालुक्यातील अंबाडी-वज्रेश्वरी रस्त्यावर घडली आहे. या अपघातात एका वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यशवंत दत्तात्रय पाटील (रा. दिघाशी) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर, या अपघात चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चार वाहनांना दिली धडक
आज सकाळी साडेसहा- सातच्या सुमारास वज्रेश्वरीकडून अंबाडीच्या दिशेने निघालेल्या भरधाव डंपरने एका स्विफ्ट कारसह दोन टेम्पो व एक दुचाकी, अशा चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका टेम्पोचा चक्काचूर झाला असून, टेम्पो चालक यशवंत पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
भरधाव वाहनांमुळे निष्पापांना गमवावा लागतो नाहक जीव
डंपर चालकाने वज्रेश्वरी ते अंबाडी रस्त्यावर प्रथम सवरोली येथे कार व टेम्पोला धडक दिली. त्यानंतर झिडके येथे दुचाकीला धडक दिली. स्थानिकांनी डंपर चालकाला पकडून गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
हेही वाचा - ठाण्यात गॅस भरताना व्हॅनला आग, पेट्रोल पंपावर धावपळ