ठाणे - परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणल्यानंतर संभाव्य कोरोना वाढीचा धोका लक्षात घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येते. मात्र, अशा वेळी उल्हासनगरमधील एका नागरिकाला क्वारंटाईन केले असता त्याने तेथून पळ काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्या नागरिकाच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरी व इतर कामानिमित्ताने परदेशात गेलेल्या भारतातील नागरिकांना केंद्र सरकारच्या वंदे भारत या उपक्रमाद्वारे भारतात आणण्यात येत आहे. अशा नागरिकांना भारतात आणल्यानंतर ते राहत असलेल्या जिल्ह्यातील विशिष्ट ठिकाणी 15 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येते.
उल्हासनगरमध्ये राहणारा अन्सारी अलीमर हा दुबई येथे नोकरीला होता. त्याला इतर नागरिकांप्रमाणे भारतात 5 जुलै 2020 रोजी विमानाद्वारे आणले. एअरपोर्ट नोडल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना तुंगा या हॉटेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. मात्र, क्वारंटाईनचा कालावधी समाप्त होण्यायापूर्वीच अन्सारीने तेथून पळ काढला.
या संदर्भात एअरपोर्ट नोडल अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर तक्रार केली. उल्हासनगर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार वासुदेव पवार यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अन्सारी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत .