ठाणे - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळाजवळ बल्याणी गावात ही घटना घडली. मोहिनी गुप्ता (वय १९) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. नीरज मोर्या (वय २०) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मृत मोहिनी उत्तरप्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यातील रहिवासी होती. ती आरोपी नीरजसोबत गेल्या २ महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. दोघेही बल्याणी गावातील गायकवाड चाळीतील एका खोलीत भाड्याने राहायचे.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून मोहिनी त्याच्या जोडीला दिसत नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आरोपी नीरजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस चौकशी दरम्यान त्याने धक्कादायक माहिती दिली, मोहिनी माझ्यासोबत वारंवार भांडण करीत होती. या भांडणाच्या रागातून १ नोव्हेंबरला तिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमाराला एका प्लॅस्टिकच्या गोणीत तिचा मृतदेह भरून परिसरात असलेल्या एका कचरा कुंडीत गोणी टाकली. त्यांनतर बिंग फुटू नये म्हणून गोणीत असलेल्या मृतदेहावर रॉकेल टाकून जाळले. आरोपीने दिलेला कबुली जबाब ऐकून पोलीसही थक्क झाले होते.
दरम्यान, मोहिनीच्या खुनाचा गुन्हा १२ दिवसातच ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोंढे यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. तर आरोपी नीरजला न्यायालयात हजर केले असता १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.