ठाणे - एकत्र काम करणाऱ्या दोघा सहकारी कामगारात वाद होऊन त्यापैकी एकाने कटरच्या साहायाने सहकाऱ्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सिद्धार्थ इंटरप्राइजेस लॅमिनेशन पेपर गोदामात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. राजू क्यातम (वय 18 वर्षे), असे हत्या झालेल्या सहकारी तरुणाचे नाव असून मोहम्मद असिफ अन्सारी (वय 21 वर्षे), असे हत्या करून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
गोडाऊनमध्ये हत्या करून आरोपी पसार
भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचात हद्दीत सिद्धार्थ इंटरप्राइजेस नावाने लॅमिनेशन पेपरचे गोदाम आहे. या गोदामात दोघेही गेल्या वर्ष भरापासून काम करत होते. काम करत असतानाच कामाचे श्रेय घेणे, कोण चांगले काम करतो. यावरून दोघांमध्ये एक महिन्यांपासून वाद होत होते. दुपारी दीडच्या सुमारास याच मुद्द्यावरून त्यांच्यात गोडाऊनमध्ये भांडण झाले. त्यावेळी आरोपी अन्सारीने कटरने राजूचा गळा चिरला. त्यांनतर घटनास्थळावरून पळून गेला.
आरोपीच्या शोधात तीन पोलीस पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत राजूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना करून अन्सारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तर आरोपीच्या शोधात पोलिसांची तीन पथके रवाना केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी दिली आहे.
हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांची भाऊबीज भेट, शनिवारपासून १०० 'लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल' बसेस