ठाणे - महाराष्ट्रासह विविध राज्यातील पोलीस ठाण्यांत जबरी चोरी, चैन स्नॅचिंगचे तब्बल ९० हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या भिवंडीतील नारपोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय या गुन्हेगाराकडून १ लाख २ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. बाकर उर्फ बाबर अक्रम अल्ली (३९ मूळ रा.गुलबर्गा,कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारच नाव आहे.
धूम स्टाईलने दुचाकीवरून चोरी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा कर्नाटक राज्यात राहणारा बाकर उर्फ बाबर हा सद्यस्थितीत कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील पाटीलनगर वास्तव्यास आहे. दरम्यान त्याने २७ ऑक्टोबर रोजी वसई रोडने अंजुर फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षातील 3 महिलांपैकी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन साथीदाराच्या मदतीने धूम स्टाईलने दुचाकीवरून जबरीने हिसकावून पळून गेला होता.
गुन्हेगाराचा शोध सुरू: याप्रकरणी समिक्षा सुनिल पाटील ह्या महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांनी त्या गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे. पोलीस तपास सुरु असतानाच गुप्त बातमीदारामार्फत बाबर अल्ली कल्याण तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी शेलार यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस पथकासह सापळा रचून त्याला उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरातून गुरुवारी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलीस कोठडी सुनावली: या गुन्हेगाराकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने भिवंडीत २ गुन्ह्यांची कबुली देत त्याच्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यात ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान गुन्हेगाराला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोनि (गुन्हे) संभाजी जाधव, सपोनि डी.डी. पाटील, बी.एस.नवले, पोह भगवान चव्हाण, हरेश म्हात्रे, पोना लक्ष्मण सहारे, सुनिल शिंदे, योगेश क्षीरसागर, मयूर शिरसाट, विजय ताठे या पोलीस पथकाने कारवाईत सहभाग घेतला होता.