ठाणे - दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. दुपारच्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. ठाण्यातील वंदना एसटी डेपो आणि वंदना सिनेमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पाणी साचले असून दुकानात पाणी साचले आहे.
या पाण्यातून वाट काढताना अनेक गाड्या बंद पडत आहेत. तसेच या भागात पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवणे गरजेचे आहे. मात्र, ते कुठेही दिसून येत नाही पालिका कर्मचारी या ठिकाणी आले. मात्र, पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे दिवसभरात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना देखील समोर आलेली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणताही अनुचित प्रकार नाही
सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आज ठाण्यात घडला नाही. त्यामुळे प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये सतर्क राहण्याचे आवाहन ठाणेकर नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - माळशेज घाट धबधब्यांसह मनमोहक हिरवळीने सजला