ठाणे - महाडमध्ये कोसळलेल्या तारिक गार्डन इमारतीची दुर्घटना ताजी असताना मुंब्य्रात या घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. मुंब्य्रातील ठाकूरपाडा परिसरात असलेल्या तळ अधिक पाच मजली प्रियांका अपार्टमेंट इमारत कलली असल्याचे मंगळवारी (25 ऑगस्ट) रात्री निदर्शनास आले. ही बाब समजताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने येथील नऊ कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवून इमारत रिकामी केली. या इमारतीचे बांधकाम 12 वर्षांचे असल्याने तिच्यावर पालिका लेखापरीक्षण अहवाल आल्यामुळे पाडण्याची कारवाई सुरू केली आहे.
गेले चार महिने संपूर्ण यंत्रणा ही कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये गुंतल्याने या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेने मात्र शहरातील सर्व अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत, असा दावा केला आहे. तर कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये यंत्रणा गुंतली असली तरी धोकादायक इमारतींककडे प्रशासन लक्ष ठेऊन असल्याचे पालिकेत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. राहते घर सोडण्याची रहिवाशांची मानसिकता नसल्याने अजूनही नागरिकांचे वास्तव्य या धोकादायक इमारतींमध्ये आहे.
आज (27 ऑगस्ट) या इमारतीच्या काही भागावर तोडक कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी (28 ऑगस्ट) पुन्हा या भागात कारवाई करण्यात येेणार आहे. या भागात जाण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला अडचण निर्माण झाली आहे. मात्र पुन्हा एकदा सकाळी कारवाई हाती घेतली जाणार आहे.
हेही वाचा - तीन हात नाका सिग्नल ते युरेका फोर्ब्स, 'सिग्नल शाळे'च्या विद्यार्थ्याचा रोमहर्षक प्रवास