ठाणे : डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातील प्राज टेक्सटाइल कंपनीला काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने शेजारी असलेली परफ्यूम बनवणारी रॅमसन्स कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन्ही कंपन्या या आगीच्या विळख्यात सापडल्या होत्या. रॅमसन्स कंपनीत परफ्युमचा मोठा साठा असल्याने मोठ मोठे स्फोट होत होते. याच कंपनीच्या मागील बाजूला सीएनजी गॅसचा पंप असल्याने आजूबाजूच्या परिसराला मोठा धोका निर्माण झाला होता.
20 गाड्या घटना स्थळी दाखल : आग आटोक्यात आण्यासाठी कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागासह भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि नवी मुंबई येथून अग्निशमन दलाच्या जवळपास 20 गाड्या 8 ते 10 टँकर घटना स्थळी दाखल झाल्या. कंपनीच्या मागील बाजूस सीएनजी पंप असल्याने अग्निशमन दलाकडून गॅस पंपाला कुलिंग करण्याचे काम आज दुपारपर्यत सुरू होते. या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी बुधवारी संध्याकाळी कंपनी बंद करून घरी निघून गेल्याने सुदैवाने कंपनीत कोणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागला यश आले.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे घराला आग : कल्याण नजीक मोहने येथील उड्डाणपुलाच्या जवळ असलेल्या शिवसृष्टी को ऑप रेटिव्ह सोसायटीतील तळमजल्यावरील रूम नंबर 5 येथे शॉर्ट सर्किटने काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. हा रूम विश्वनाथ सुर्वम यांची असल्याचे समजते. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील मिक्सर, ग्राइंडर, फ्रीज पाण्याची टाकी इत्यादी सामान जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. कुठल्याही प्रकारची जीवित हानी नाही. सदरील आग विझवण्यासाठी आधारवाडी व टिटवाळा येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना झाल्या होत्या. अशी माहिती टिटवाळा अग्निशमन दलाचे नवाब तडवी यांनी दिली.
भिवंडीत आगडोंब : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नवीन नाहीत.परंतु मार्च महिना उगवला की त्यामध्ये वाढ होत असते.नुकताच पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत पद्मिनी कॉन्प्लेक्स येथील 2 गोदामात भीषण आग लागली आहे. गोदामात लाकूड पॉलिश करण्यासाठी आणि मेणबत्त्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या रसायनांचा मोठा साठा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि संपूर्ण गोदाम खाक झाले. दरम्यान, पहिल्या मजल्यावरील कागदी गोदामात ठेवलेले मंडप सजावटीचे साहित्यही आगीत जळून खाक झाले आहे. माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली.
भिवंडीत कारला भीषण आग : भिवंडी शहरातील भादवड येथे एका व्यावसायिकाने पार्क केलेल्या कारला अचानक आग लागली आणि आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. भादवड गावातील इमारत बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या राजेश जैस्वाल यांनी त्यांची हुंडाई ऑरो कार कार्यालयाबाहेर उभी केली असता अवघ्या दहा मिनिटांनी धूर निघताना दिसला. होंडा ऑरो MH04 4993 क्रमांकाच्या कारला आग लागली. संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.
आगीत संपूर्ण घर जळून खाक : घराच्या दर्शनी भागात असलेल्या दुकानात लावलेला तेलाचा दिवा पडल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक होण्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे .भिवंडी शहापूर तालुक्याच्या सीमेवरील वेहलोंडे या गावात ही दुर्घटना घडली आहे. या गावातील सुभाष वेखंडे यांचे कौलारू घर असून घरच्या दर्शनी भागात किराणा दुकान आहे .या दुकानात लावलेला तेलाचा दिवा हा रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पडल्याने आग लागली. हळूहळू आगीने लाल रंग घेतला आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढले. घर लाकडाचे असल्याने आग विझविण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी वाशिंदच्या जिंदाल कंपनीचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत घरातील सर्व साहित्य, मौल्यवान वस्तू, कपडे, धान्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हॉटेलमध्ये चिमणीने घेतला पेट : भिवंडी मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात हॉटेल व ढाबे असून महामार्ग लगत असलेल्या मिनी पंजाब हॉटेलमध्ये बसवण्यात आलेल्या किचन मधील चिमणीने अचानक पेट घेतला यावेळी एकच खळबळ उडाली होती. किचन मधील सर्व गॅसचे बाटले यावेळी बाहेर काढण्यात आल्याने मोठे जीवित हानी टळली असून तेथे काम करणाऱ्या नागरिकांनी तेथील सीस फायर च्या सहाय्याने अर्धा ते एक तासाने अथत प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
हेही वाचा - Maha Budget 2023 : राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी