ठाणे - भिवंडी तालुक्यातील खांडपे गावातील अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला ७ वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा सत्र व विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी या खटल्याची सुनावणी केली.
खांडपे याथील आशीर्वाद विष्णू पाटील (वय २३) हा याच गावातील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार शारिरीक अत्याचार करत होता. ती मुलगी दररोज ओहोळावर कपडे धुण्यासाठी जात होती. त्याच वेळी आशीर्वाद माळरानावर जनावरे चारण्यासाठी जात असे. याचा फायदा घेऊन तो तिच्यावर सतत अत्याचार करत असे. यासाठी तो तिला लग्नाचे अमिष दाखवत असे.
यातून ती मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे ही गोष्ट उघड झाली. हा प्रकार उघडकीस आल्यावर मात्र, आरोपीने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०१७ ला त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याचा युक्तीवाद न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्यासमोर झाला. सरकारी वकील म्हणून विवेक कडू तर आरोपीच्या बाजून संतोष भामरे यांनी काम पाहिले. सरकारी वकिलांनी सादर केलेल्या साक्षीदारांची साक्ष तसेच, पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आशीर्वादला दोषी ठरवले.