ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काल (रविवारी) तब्बल 150 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 24 तासात 67 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
सध्याच्या स्थितीत विविध रुग्णालयात तब्बल 629 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिम व पूर्वमधील गवळी नगर विजय नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तर डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडीमधील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर महापालिका क्षेत्रात एकूण मृतांची संख्या 42 झाली आहे.
आजच्या रुग्णांची विगतवारी पहाता कल्याण पूर्वेत 11 रुग्ण, कल्याण पश्चिमेत 11 रुग्ण, डोंबिवली पूर्व परिसरात 20 रुग्ण, डोंबिवली पश्चिमेत 15 रुग्ण आढळले असून टिटवाळामधील सुमुख सोसायटी रोड, आरोग्य केंद्रा जवळ मांडा, वासुंद्री रोड, पूर्व आणि काशीनाथ तरे नगर टिटवाळा पूर्व या भागात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आंबिवलीमधील नारायण मंदिर जवळ, मोहना पूर्व आणि राहुल कोट ऑफिस जवळ 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान समाधानजनक बाब म्हणजे, पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55 टक्क्यांवर गेले आहे. मात्र, नवीन रुग्णात भर पडत असल्याने पालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.