ठाणे - आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा बलाच्या सीआयबी सेलने मेल गाड्यांमधून लूटमार व चोरी करणाऱ्या टोळीतील 6 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पाच प्रकरणांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
पुष्पक आणि कामयानी एक्स्प्रेसमधून लुटारू ताब्यात -
गुप्त माहितीच्या आधारे सीआयबीचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर अन्वर शाह, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल ललित वर्मा, नीलकंठ गोरे आणि कल्याण सीपीडीएस (बी) टीम एएसआय एस. के. सैनी, हेड कॉन्स्टेबल अनिल उपाध्याय आणि जितेंद्र सिंह यांच्या पथकाने छापा टाकला. शंकर निर्मल शाह, प्रकाश मनशंकर सेवक, धनंजय ओमप्रकाश शुक्ला, इमरान उमर खान, बालेश्वर विजय साहू आणि राजेश राधेश्याम चौधरी या आरोपींना पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर या 6 दरोडेखोरांना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सीआयबीच्या पथकाने या सर्व लुटारुंना पुष्पक आणि कामयानी एक्स्प्रेसमधून जेरबंद केले आहे.
4 वर्षांपासून करत आहेत लांब पल्ल्याच्या गाड्यांत लुटमार -
हे आरोपी 4 वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांचे दागिने, मोबाईल फोन, पर्स आणि मौल्यवान वस्तू चोरी करत आहेत. दरोडेखोर टोळीच्या अटकेनंतर लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये होणाऱ्या चोऱ्या-लुटमारीला बऱ्याच अंशी चाप बसणार आहे.