ठाणे - भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच रविवारी शहरात पाच नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातदेखील एक नवा रुग्ण आढळला असून रविवारी एकूण सहा नवे रुग्ण आढळले आहेत. या सहा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 141 वर पोहोचला आहे.
शहरातील पाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवीवस्ती येथील 32 वर्षीय महिला घाटकोपर येथून आपल्या 13 वर्षाच्या मुलीसह आली होती. त्यांचे कोरोना अहवाल तपासणीसाठी पाठवले होते. ते पॉझिटिव्ह आले आहेत. तर 60 वर्षीय पुरुष राहणार अजय नगर हे कंपाउंडर म्हणून दवाखान्यात काम करत असून गेल्या आठ दिवसापासून आजारी होते. त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. चौथा रुग्ण 25 वर्षीय गरोदर महिला ही राहणार फुले नगर येथील रहिवासी असून त्या कळवा येथे गेले पाच-सहा दिवस डिलिव्हरीसाठी गेल्या असता, तेथे पॉझिटिव्ह आढळली आहे. तर पाचवा रुग्ण या 57 वर्षीय महिला पोलीस असून त्या एस टी कॉलनी येथे राहतात. त्या आपल्या पॉझिटिव्ह मुलाच्या संपर्कात आल्याने कोरोनाबाधित झाल्या आहेत.
अशा प्रकारे शहरात पाच नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवी वस्ती येथील 65 वर्षीय पुरुष हे क्षयरोग आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर कळवा येथे उपचार सुरू होते. परंतु दोन दिवसापूर्वी त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांना शहरातील आय जी एम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आला. सदर वृद्ध कोरोनाग्रस्त आढळून आला. अशाप्रकारे भिवंडीत शहरात 78 रुग्णसंख्या झाली असून यामध्ये 32 रुग्ण बरे झाले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे व 44 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील गुंदवली गावात एक 32 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळला आहे. या एका नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा 63 वर पोहचला आहे. तर 26 रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 36 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता 141 वर पोहचला असून त्यापैकी 58 रुग्ण बरे झाले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 80 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.