ठाणे - भिवंडी शहर परिसरात दोन जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समदनगर येथे एकाच कुटुंबात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेले ५ रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आठ दिवसांपूर्वीच मुकेश रामदास चौधरी (३४ रा. ताडाळी) व समृद्धी सतिष वाघमारे (३ रा.मीठपाडा, शेलार ) या दोघांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने झाला होता. तर वकार ऐनुलहक उर्फ पप्पू शेख (५०), शबनम वकार शेख (४२), हिना वकार शेख (२२), नेहा वकार शेख (२०), उमर वकार शेख (१२, सर्व राहणार - समदनगर) अशी स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या कुटुंबीयांची नावे आहेत.
यातील कुटुंब प्रमुख वकार शेख यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कुंटुंबातील पत्नी शबनम व मुलांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनाही स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शबनम यांना उपचारासाठी मुंब्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तिन्ही मुले कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी सांगितले. भिवंडी शहरात स्वाईन फ्ल्यूचा आजार पसरण्याची भीती वाढल्याने पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय पथकासह तात्काळ शेख कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून समदनगर परिसरात पालिका प्रशासनाने वैद्यकीय शिबीर लावून शहरातील १५ आरोग्य उपकेंद्र तसेच स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. सतर्कता म्हणून नागरिकांना स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक टॅमीफ्ल्यू गोळ्या व इन्फ्ल्यून्झा लस टोचण्याची मोहिम सुरू केली आहे. भिवंडी शहरात ऐन रमजान महिन्यात स्वाईन फ्ल्यूचा आजार वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.