ठाणे - महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पान मसाला ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरात पोहोच होत आहे. मात्र, गुटखा माफियांचा अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. दिलीप वलेचा आणि निलेश डिंगरा यांच्यासह तीन वाहन चालकांना अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने अटक केली. तसेच, त्यांच्याकडून १६ लाख रुपयांच्या गुटख्यासह ४ वाहने ताब्यात घेत विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधिन केली आहेत. विशेष म्हणजे बेकायदा गुटखा विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या एकूण १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ५ आरोपींना अटक केली आहे.
लाखोंचा गुटखा विविध भागात वितरित
उल्हासनगर शहरातील विठ्ठलवडी पोलिसांच्या हद्दीतील गुरुसंगत दरबारजवळ मोठ्या प्रमाणात गुटखा आयशर ट्रकमधून आणून तो छोट्या वाहनांमधून उल्हासनगर शहरात वितरित केला जात असल्याची गुप्त माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता आणि गुप्तवार्ता विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे, गुरुसंगत दरबारजवळ सहआयुक्त समाधान पवार, सहाय्यक आयुक्त रमेश जाधव, दक्षता व गुप्तवार्ता अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांच्या पोलीस पथकाने काल (16 जून) रात्रीच्या सुमारास धाड टाकली. मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोनजण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, कुख्यात गुटखा माफिया दिलीप वलेचा, निलेश डिंगरा यांच्यासह चालक दत्तात्रय एकशिंगे, जयेश गुलाबानी, सोमनाथ फुलमाळी यांना अटक केली.
फरार आरोपींचा शोध सुरु
अटकेतील गुटखा माफियांकडून गुटख्याने भरलेली एक इनोव्हा, एक टाटा एस छोटा टेम्पो, थ्री व्हिलर टेम्पो आणि एक आयशर ट्रक हस्तगत करण्यात आला आहे. या गाड्यांमधून पान मसाल्याची ३ हजार ४५४ पाकीटे (६ लाख ३७ हजार रुपये), केसरीयुक्त विमल पान मसाला १ हजार ८७२ पाकीटे (5 लाख २४ हजार रुपये), व्ही १ टोबॅको ३ हजार २३६ पाकीटे (८७ हजार २०८ रुपये) आणि एस प्लस चेविंग टोबॅकोची ३ हजार ७४४ पाकीटे (१ लाख १२ हजार रुपये) असा एकूण १५ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करून विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधिन केला. आता विठ्ठलवाडी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - वाहनचालकांना दिलासा! ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ