ठाणे - कोरोनामुळे ठाण्यात शनिवारी आणखी एका पोलिसाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चितळसर पोलीस ठाण्यातील एका 46 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यासह ठाणे पोलीस दलातील मृत्यूची संख्या चार झाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या वाढत्या मृत्यू दरामुळे चिंतेचे वातावरण आहे.
कोरोना संकटाच्या काळात मागील काही महिन्यांपासून अविरत काम करणाऱ्या पोलीस दलातील कोरोना योद्धांनाच, कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दलात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असून शनिवारी दुपारी चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांचा कोरोनाने मृत्यू झाला.
भिवंडी येथे राहणारे पोलीस नाईक यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 25 जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 जुलै रोजी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शनिवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा - भावाने केली भावाची हत्या, दुकानदार भावासह २ नोकरांना अटक
हेही वाचा - ...पण कोरोना आपल्याला कंटाळलेला नाही; मंत्री आदित्य ठाकरेंची ठाणे मनपाला भेट