ठाणे - रीक्षा बॅगा ठेवणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, पोलिसांनी त्याला हटकले असता, त्याने त्याच्याजवळील सर्व बॅगा रिक्षात ठेवून पोबारा केला. दरम्यान पोलिसांनी या बॅगांची झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी गांजाने भरलेल्या एकूण सहा बॅगा जप्त केल्या असून, अज्ञात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
44 किलो गांजा जप्त
कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक विभागात गस्त घालत असताना, बुधवारी पहाटे पोलिसांना एक व्यक्ती त्याच्याजवळील काही बॅगा रिक्षात ठेवताना आढळला. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या त्यामुळे पोलिसांनी त्याला हटकले. या बॅगामध्ये कपडे असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले, मात्र पोलिसांनी त्यांना बॅगा उघडायला सांगताच, दोन्ही आरोपी बॅगा रिक्षात तशाच सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला मात्र त्यांना पकडण्यात अपयश आले. दरम्यान पोलिसांनी या बॅगा ताब्यात घेऊन तपासणी केली असात त्यामध्ये 44 किलो गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्याची किमंत साडेनऊ लाखांच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.