ठाणे - कल्याण, डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिने ११ दिवसांत ४०२ जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. ही लाट १५ मे नंतर ओसरणार असली, तरी पुन्हा जुलै, ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी महापालिका हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते. मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. मात्र जुलै २०२० मध्ये एका दिवसांत ६६४ रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र दिवाळीनंतर रुग्ण संख्या घटू लागली होती. तर जानेवारीत पहिली लाट ओसरल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, १७ फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज एक ते दोन हजारांच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता, पुरवठ्याच्या ऑडिटसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांची वेळेत उपलब्धता न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
आजही आढळले ४१५ रुग्ण
दरम्या महापालिका क्षेत्रात आजही ४१५ रुग्ण आढळून आले आहेत. तर ८१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एकूण 5 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेची तायरी सुरू
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे विमा कंपनीच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयात ५० टक्के बेड हे मुलांसाठी आरक्षीत ठेवले जाणार आहेत, तसेच मुलांसाठी आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. महापालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बालरोगतज्ज्ञ आहेत. परंतु प्रत्येक रुग्णालयास प्रत्येकी दोन असे चार बालरोगतज्ज्ञ भरती केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - औरंगाबादमधील ऑक्सिजन प्लांटचे काम संथगतीने, भाजपाकडून आंदोलनाचा इशारा