मीरा भाईंदर (ठाणे) - शहरात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
दिवसाला 50पेक्षा अधिक रुग्ण -
मीरा भाईंदर शहरात कोरोना आजाराने आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून 100हुन अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 28 हजार 171 इतकी झाली आहे. म्हणून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या नियमावलीच्या आधारे मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने 31 मार्च पर्यंत शहरात नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सिनेमागृह, हॉटेल, उपाहारगृह, आरोग्य सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये, दुकाने पूर्वीप्रमाणे म्हणजेच 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. विवाह समारंभासाठी 50, तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. विशेष म्हणजे, नव्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले तर, संबंधित आस्थापनांना कोरोना महासाथ संपेपर्यंत टाळे लावण्यात येणार आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय
...तर 25 हजार रुपयांचा दंड -
मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे समोर आले. तसेच अनेक वेळा सूचना देऊनही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचे परिपत्रक आयुक्त दिलीप ढोले यांनी काढले आहे.
गेल्या 15 दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नव्याने राज्य सरकारने नियम लागू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून नवीन नियमावली जारी केली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी नियमाचे उल्लंघन होईल, त्याठिकाणी प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. संभाजी वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
हेही वाचा - हे सत्ता प्रायोजित हप्ता कांड..! वाझे कांडावर निरुपमांचा शिवसेनेवर निशाणा