ठाणे - मोबाईलमधील सेल्फी व टिकटॉक या अॅपची भुरळ आजकालच्या तरुणाईमध्ये वाढत असून त्यासाठी हे तरुण वाट्टेल तो धोका पत्करण्यास तयार असल्याचे आढळून येत आहे. अशाच प्रकारे ठाणे ते मुंब्रा रेल्वेमार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण मंडळी सेल्फी व टिकटॉक व्हिडीओ चित्रित करीत असल्याचे आढळले. त्यामुळे ठाणे रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) छापा मारून दोन तरुणांच्या गठड्या आवळल्या आहेत.
धावत्या रेल्वेमधून लटकणाऱ्या आणि स्टंट करणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलिसांची कारवाई नेहमीच सुरू असते. तरीही काही तरुण नवनवे साहसी फंडे अवलंबित असतात. ठाणे ते मुंब्रादरम्यान बांधकाम सुरू असलेल्या लोखंडी पुलावर काही तरुणमंडळी सेल्फी काढताना आणि आपला व्हिडीओ टिकटॉक व्हिडीओ चित्रित करीत असल्याच्या तक्रारी आरपीएफकडे आल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांनी अचानक छापा मारून कारवाई केल्याची माहिती आरपीएफचे पोलीस निरीक्षक ए. के. यादव यांनी दिली. मुकसिद इब्राहिम मुकादम आणि मोह. कासीम सय्यद (२०, रा. मुंब्रा, बॉम्बे कॉलनी) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.