नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत गेल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी दोन भाजपच्या नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आजच त्यांनी मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
नवी मुंबई तुर्भे मधील सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच भाजपच्या नेरुळ विभागातील नगरसेविका कविता अंगोडे व सुरेखा नगरबागे या दोघींनीही पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज या दोघींनीही आपल्या नगरसेविका पदाचा राजीनामा नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे दिला आहे. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेता विजय चौगुले व शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर हे उपस्थित होते.
गणेश नाईक हे अंत्यत चांगले नेते आहेत. मात्र, त्यांच्या आजूबाजूला सगळी चांडाळ चौकडीचा भरणा आहे. त्यांच्या राजकारणाला कंटाळून या दोन नगरसेविकांनी राजीनामा दिला असल्याची माहिती चंद्रकांत अंगोडे यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी नगरसेवक शिवसेनेत येतील अशी आशा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत महाआघाडीची ताकद वाढत असून, विजयही महाआघाडीचा होईल असेही नाहटा यांनी सांगितले.