ठाणे : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा कल्याण पूर्वेत कुटुंबासह राहून तो एका इंग्रजी स्कुलमध्ये ९व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी महिला ही नाशिकमध्ये राहणाऱ्या मुलाच्या आत्याची मानलेली मुलगी असून तिला दोन मुले आहेत. आत्या कल्याणला आली की, तिच्यासोबत तिची आरोपी ३२ वर्षांची मानलेली मुलगी कल्याणला पीडित मुलाच्या घरी येत होती. यामधून मुलगा आणि विवाहितेची ओळख झाली.
शारीरिक संबंध प्रस्थापित : मुलगा नाशिक येथे आत्याकडे नियमित जाऊ लागला. शिवाय तो तीन महिने राहू लागला. तर आरोपी ही पीडितेच्या आत्यासोबत कल्याणला आली की तो मुलगा आणि ती मुंबईला फिरण्यास जात होते. यामधून मुलगा आणि आरोपी महिला यांच्यात नियमित बोलणे सुरू असायचे. या संवादातून दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर मात्र मुलगा नियमित शाळेकडे पाठ फिरवून नाशिकला जाऊन राहू लागल्याने त्याला आई-वडील विरोध करीत होते. हा सर्व प्रकार २०१९ पासून सुरू होता.
महिलेने मोबाईल घेऊन दिला : खळबळजनक बाब म्हणजे, आरोपी महिलेने मुलगा तिच्याशी सतत संपर्क रहावा तसेच त्याला मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती बघण्यासाठी २० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. मुलाच्या हातात असलेल्या मोबाईलविषयी चौकशी केली असता, त्याने तो नाशिकच्या आरोपी महिलेने घेऊन दिल्याचे सांगितल्याने आईला संशय बळावला.
शिक्षकामुळे प्रकरण चव्हाट्यावर : त्यातच आईने मुलाच्या खासगी शिकवणीतील शिक्षकाला मुलाला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सांगितले असता, त्यावेळी मुलाने आपले नाशिक येथील एका महिलेशी संबंध असल्याचे सांगितले. आपणास अश्लील चित्रफिती पाहण्याची सवय लागल्याची माहितीसुद्धा विद्यार्थ्याने शिक्षकाला दिली. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखविले. पण, त्यात फरक पडला नाही. मुलगा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला दारूसाठी पैसे कुठून येतात असे विचारले असता मुलाने खानावळीत काम करून मिळालेल्या पैशातून दारू पित असल्याचे सांगितले.
बाल सुधारगृहात केले दाखल : विशेष म्हणजे मुलाचा मोबाईल आईने ताब्यात घेतला तरी तो आई किंवा आजीच्या मोबाईलवरून आरोपी महिलेशी संपर्क करत होता. शिवाय मोबाईल काढून घेतल्याने तो रागाने नाशिक येथे आरोपी महिलेच्या घरी जात होता. मुलगा व्यसनी बनून बिघडत चालला आहे हे जाणून कुटुंबीयांनी त्याला भिवंडी शहरातील बालसुधारगृहात दाखल केले. शासनाच्या बालहक्क सुधार विभागाकडून मुलाला समुपदेशन करण्यात येऊ लागले. आरोपी महिलेमुळे आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याला विविध व्यसने लावून वाममार्गी लावल्याचा आरोप मुलाच्या आईने केला. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून सोमवारी कोळसेवाडी पोलिसांनी त्या महिलेविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
हेही वाचा : Pune News : 10 कोटींची गुंतवणूक करत जर्मन दाम्पत्यांनी ओसाड माळरानावर लावले 35 हजार झाडे