ठाणे - तब्बल ३८ गुन्ह्यांची उकल करत त्यामधून ६९८ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, मोटारसायकल, मोबाईल टॉवर बॅटरी अशा विविध चोऱ्या, घडफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या गुन्ह्यांमधील १५ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २१ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा - एकनाथ शिंदे बोलतात एक वागतात एक, ठाणे काँग्रेसचा आरोप
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रासह भिवंडीत मागील काही महिन्यात घरफोडी, चैन स्नॅचिंगसोबतच फसवणुकीतून लुटमारीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त किसान गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी कारवाई केली. तसेच मोक्काअंतर्गत कारवाई झालेला परंतु दीड वर्षांपासून फरार असलेला सराईत साखळी चोरटा अलिहसन फिरोज सय्यद (रा . आंबिवली कल्याण) व त्याचा साथीदार समीर शब्बीर इराणी उर्फ समीर संपत भंडारी (रा . पुणे )या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून कोळसेवाडी, मानपाडा, टिळकनगर, डोंबिवली, विठ्ठलवाडी या पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल सात गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्याकडून १७४ ग्राम वजनाचे ५ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तर, भिवंडी परिमंडळ दोनमधील सात आरोपीना अटक करत त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल १५ गुन्हे उघडकीस आणले असून या गुन्ह्यातील ११ लाख ३४ हजार रुपयांचे ३७८ ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे.
हेही वाचा - सीकेपी बँकेला 30 कोटींचा चुना लावणारा 'वाघ' पोलीस कोठडीत
तसेच महिलांना रस्त्यात गाठून त्यांच्याजवळील दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या जवळील दागिने चोरी करणारा राहुल कन्हैया सोळंकी यास अटक केली आहे. त्याच्याकडून दहा गुन्ह्यांची उकल करत १४६.५ ग्रॅम वजनाचे ४ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यासोबतच एक मोटार सायकल, मोबाईल टॉवर बॅटरी चोरी अशा सहा गुन्ह्यांची उकल करत १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये २० लाख ९५ हजार ५०० रुपयांचे दागिने व इतर मुद्देमाल व रोख रक्कम १ लाख २ हजार असा एकूण २१ लाख ९७ हजार ५०० रुपयांच्या गुन्ह्यांची उकल केली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, संतोष चौधरी, शरद बरकडे, लक्ष्मण जोरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष अहिरे, अब्दुल मन्सुरी, रमेश शिंगे, पो हवा दिलीप शिरसाट, रवींद्र पाटील, प्रवीण जाधव, राजेंद्र आल्हाट, सुधाकर चौधरी ,किशोर माने, संदीप माने, संदीप राजे, पोना प्रकाश पाटील, राजेंद्र सांबरे, अनिल पाटील, प्रमोद जाधव, प्रमोद धाडवे, श्रीधर हुंडेकरी, सचिन जाधव, रवींद्र साळुंखे, नीता पाटील, मेघना कुंभार या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.