ठाणे - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जात आहे. सोमवारी येथे 147 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी 150 रुग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. ठाणे पालिकेच्या दहा प्रभाग समितीत कोरोनाच्या नव्या रुग्णांची वाढ सातत्याने होत आहे. मागील पंधरवड्यात रोज 100 पेक्षा अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत.
येथे आतापर्यंत 213 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ठाणे पालिकेच्या दहा प्रभाग समितीत सोमवारी सापडलेल्या नव्या रुग्णांची संख्या 147 इतकी आहे. आतापर्यंत 3 हजार 241 म्हणजे 52 टक्के रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर प्रत्यक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 989 इतकी आहे.
हेही वाचा - देशात सर्वाधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात, आतापर्यंत 7 लाखहून अधिक नमुन्यांची तपासणी
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आतापर्यंत 37 हजार 409 इतक्या नागरिकांच्या कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 37 हजार 195 नागरिकांच्या कोरोना अहवाल प्राप्त झालेला आहे. तर उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. तर ठाणे पोलीस दलातील 4 पोलीस कर्मचारीही यशस्वीरीत्या कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. एकीकडे नवीन रुग्णांची संख्या शंभरावर पोहचत आहे. तर तेच दुसरीकडे बरे होणाऱ्यांचीही संख्या शंभरावर पोहोचत आहे. यावरून ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे त्याला पायबंद घालण्यात पालिका प्रशासनाला काही अंशी यश लाभले आहे.