मीरा भाईंदर (ठाणे) - महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त यांनी मीरा भाईंदर क्षेत्रातील १३ खासगी हॉटेलला संशयित रुग्णांना अलगीकरणसाठी परवानगी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या १३ हॉटेलमध्ये कोरोना संशयित रुग्णांना अलगीकरनासाठी २५०० रुपये प्रतिदिवस अधिक जीएसटीसुद्धा स्वतःच्या खिशातून द्यावा लागणार आहे.
मीरा भाईंदर शहरात झपाट्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या चार हजार पार झाली आहे. जागेच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला. परंतु सामान्य माणूस गेल्या तीन महिन्यांपासून घरात बसून आहे. त्यात जर त्याला अलगीकरणासाठी प्रतिदिवस २५०० रुपये रक्कम कुठून देणार? या प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील विरोधकांकडून टीकेची झोड उठू लागली आहे. बहुतांश हॉटेल अनधिकृत, भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे आहेत. पालिकेने जारी केलेल्या यादीत हेरिटेज रिसोर्ट, समाधान हॉटेल, एस ए रेसिडेंसी, जी.सी.सी. नॉर्थ साईड हॉटेल, शेल्टर हॉटेल, जया महाल(बंटास)हॉटेल, प्रसाद इंटरनेशनल हॉटेल, मेरियाड हॉटेल, सनशाईन इन हॉटेल, सिल्व्हर डोर हॉटेल, चेना गार्डन, आनंद लॉजिग अँड बोर्डिंग, एक्वा हॉटेल अशा एकूण १३ हॉटेलला कोरोना संशयितांना अलगीकरणासाठी पैसे भरून ठेवण्यास आयुक्त डॉ.विजय राठोड यांनी मान्यता दिली आहे.
एका रूममध्ये एकच व्यक्ती राहू शकतो. संशयित रुग्णाला जेवण दिले जाणार आहे, रूममध्ये मद्यप्राशन करता येणार नाही, संशयित रुग्ण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांना व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, हॉटेलच्या लॉबी परिसराचा वापर करता येणार नाही, नागरीकांना परवडेल अश्या हॉटेलचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन आयुक्तांनी केले आहे.
या आदेशाला धुडकावत शिवसेनेने विरोध दर्शविला आहे..प्रामुख्याने हा सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने एकहाती घेतलेला निर्णय निंदनीय आहे. यातील बहुतांश हॉटेल अनधिकृत तर १३ हॉटेलमध्ये अनेक हॉटेल भाजप नगरसेवकांचे आहेत. अलगीकरण कक्षात डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका ठेवाव्या लागतात. तर प्रशासन प्रत्येक हॉटेलमध्ये कसं ठेवणार? असा प्रश्न विचारत हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. तर सदर अनपेक्षित घेतलेला सत्ताधारी भाजप आणि आयुक्त यांनी हा निर्णय रद्द करावा, अशी लेखी मागणी शिवसेना प्रवक्ते शैलेश पांडे यांनी आयुक्त डॉ विजय राठोड यांच्याकडे केली आहे. सदर निर्णयाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. ज्या १३ हॉटेलला परवानगी दिली आहे, त्या हॉटेलबाबत सर्व पडताळणी करून,पुढे चौकशी करू, अशी प्रतिक्रिया मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ विजय राठोड यांनी दिली.