ठाणे - भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे 81 नवे रुग्ण आढळले असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ग्रामीण भागात 36 नवे रुग्ण आढळले आहेत. आज शहर व ग्रामीण भागात एकूण 117 नवे रुग्ण आढळले आहेत. भिवंडी शहरात आतापर्यंत 875 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 448 रुग्ण बरे झाले आहेत, तर 66 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. तर 361 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागात आतापर्यंत 387 रुग्ण आढळले असून त्यापैकी 147 रुग्ण बरे झाले आहेत. 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 232 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शनिवारी आढळलेल्या 117 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1262 वर पोहचला असून त्यापैकी 595 रुग्ण बरे झाले आहेत. तर 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 593 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहराचा विचार करता 12 लाखाहून अधिक लोकसंख्या व कामगार असलेल्या शहरामध्ये नागरिकांना कोरोनाव्यतिरिक्त आजारपणात सुविधा देणे मनपाचे आद्य कर्तव्य आहे.
येथील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय घोषित केल्यानंतर मनपाच्या पाच प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात एक असे पाच फिवर क्लिनिक मनपाने सुरू केले आहेत. याव्यतिरिक्त शहरातील धामणकर नाका येथे असलेल्या एकमेव ऑरेंज हॉस्पिटलमध्येच कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार होत आहे. इतर खासगी रुग्णालये कोरोनाव्यतिरिक्त आजारातील रुग्णांवर उपचार करत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोना संकटात कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार जोडलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी उपचार करणे बंधनकारक असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायसह देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वच खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह रुग्णालय चालक मालकांना दिले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयासह केंद्र व राज्यशासनाच्या निर्देशांकडे खासगी रुग्णालये व डॉक्टरांचे पुरता दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भिवंडीतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यास व दाखल करण्यास खासगी रुग्णालये नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांना रिक्षा व इतर वाहनांमधून रुग्णालयांच्या पायऱ्या झिजविण्यात वेळ गेल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, कोरोनाव्यतिरिक्त आजारपणातील रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली आहे.