नवी मुंबई - आयुक्त संजयकुमार यांनी शहरात अमली पदार्थ विरोधी अभियान राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वाशी परिसरात 11 किलो गांजा बाळगणाऱ्या 4 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.
वाशी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी 4 व्यक्ती येत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्रांनी दिली. त्या अनुषंगाने कारवाई करुन छापा टाकल्यानंतर नवलेश कुमार मेघन राय (वय-25)याकडून 2 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याचसोबत वाल्मिकी कुमार नरेश राय (वय-23)कडून 2 किलो 200 ग्रॅम, दयानंद चुलहा (वय-22)कडून 2 किलो 200 ग्रॅम तसेच राजीवकुमार चेता(22)कडून 4 किलो 800 ग्राम अशा एकूण 11 किलो 300 ग्राम वजनाच्या गांजासह 1 लाख 51 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नवी मुंबई सह आयुक्त राजीव व्हटकर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सह पोलीस आयुक्त नवी मुंबई सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली.
संबधित चारही आरोपी बिहारचे रहिवासी आहेत. संबधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.