ठाणे - देशात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी विविध देश लस काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच सद्याच्या युगात मनुष्य हा विविध आजाराने ग्रासला असून त्याचे आयुष्य कमी होत आहे. मात्र भिवंडी तालुक्यातील दुघाड येथील 109 वर्षाची आजीबाई ठणठणीत असून ती आजही दगडी पाट्यावर काढा वाटून नातेवाईकांसह आसपासच्या गावातील गावकऱ्यांना देते. यातून त्यांची कोरोनाशी लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवत असल्याने त्यांच्या जिद्दीला ‘ई टीव्ही भारत’चा सलाम.
विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या विषाणूपासून बचावासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून लिंबाचा पाला, काळी मिरी, दालचिनी, सुंठ आदीचा काढा करून आजीबाई गावकऱ्यांना देत आहेत. भिवंडी तालुक्यातील दुघाड गावातील राहणाऱ्या चांगुणाबाई वामन जाधव 109 वर्षाच्या आजीबाई आहे. तर त्यांचे माहेर भिवंडी तालुक्यातील वेढे गाव असून त्यांचा जन्म 27 ऑगष्ट 1910 रोजी झाला अशी नोंद त्यांच्या आधारकार्डवर आणि त्यांच्या शाळेत सुद्धा नोंद आहे. त्या दुसरी शिकल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे पहिल्यापासून शेती कामाची आवड आहे. त्याच प्रमाणे निरोगी राहण्याचे रहस्य पाहिले असता त्या पहिल्यापासून रोज गरम पाणी पितात तर सकाळी लिंबाच्या पानाचा काढा तर काळी मिरी, सुंठ, दालचिनी याचे नियमित सेवन करतात. त्याचप्रमाणे नातेवाईक असो किंवा गावातील ग्रामस्थ यांना फार पूर्वीपासूनच ताप, सर्दी, खोकला, अशा विविध आजारावर घरगुती औषध बनवून देतात. विशेष म्हणजे आजपर्यंत आजीबाई एकदाही रुग्णालयात गेल्या नसल्याचे सांगण्यात आले. तर आजही त्यांचा आवाज खणखणीत आहे. शिवाय दुष्टीही चांगली आहे.
आजीबाईला 'इतके' आहेत नातेवाईक
आजीबाईंना एक 105 वर्षाचा भाऊ आणि दोन बहिणी तर यांना 3 मुले आहेत. त्यामधील एका मुलाचे निधन झाले. तर 2 मुली असून त्यामधील एका मुलीचेही निधन झाले. त्यांना नातवंड आणि पतवंड अशी तब्बल 49 नातेवाईकांचा गोताळा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भिवंडीतील पहिल्या सभेला होत्या उपस्थित
आजीबाईंना इंग्रजांच्या राजवटीचा काळही आठवतो. त्या सांगतात त्यावेळी एकच भिवंडी - वाडा एसटी बस होती. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भिवंडीतील पहिल्या सभेला आजीबाई आवर्जून उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली रहावी यासाठी या आजीबाई गेल्या अडीच महिन्यापासून त्यांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांना स्वतः पाट्यावर वाटून काढा बनवून देत आहेत. त्यामुळे या 109 वर्षाच्या आजीबाईची जिद्द पाहता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपणही कोरोनावर मात देऊ शकतो.