ठाणे - भिवंडीत आज (शनिवारी) आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील शहरी भागात 2 तर ग्रामीण भागातील 8 जणांचा समावेश आहे. यामुळे भिवंडीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 83 झाली आहे. तर त्यापैकी 29 रुग्ण बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे.
सध्या 53 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कामतघर येथील 45 वर्षे पुरुष आणि 38 वर्षीय महिला अशा दोघा पती-पत्नी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी त्यांच्या मुलाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्याच्या संपर्कात आल्याने या दोघांचे अहवालही शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधिताचा आकडा 40 वर पोहोचला आहे. आतापर्यंत शहरातील 17 रुग्ण बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील 22 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे, राहुल गांधींच्या मागणीला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा
ग्रामीण भागातील पडघा येथील खासगी रुग्णालयातील दोन कर्मचारी आणि काल्हेर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या एकाच कुटुंबातील सहा जण असे आठ जणांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या आठ नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा 43 वर पोहचला आहे. ग्रामीण भागातील 12 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.