ठाणे - दुचाकी लंपास करण्यात माहीर असलेल्या दुकलीवर झडप घालण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले आहे. या दुकलीकडून मध्यवर्ती पोलिसांनी १० विविध कंपनीच्या दुचाकी आतापर्यंत हस्तगत केल्या आहे. तर या चोरट्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. महादू आढारी (वय, ३२) धीरज शिंदे (वय २८, दोघेही (रा. गऊबाई पाडा, उल्हासनगर) असे अटक केलेल्या दुकलीचे नाव आहे.
दुचाकीचोरट्यांचा शहरात धुमाकूळ
अनलॉक काळापासून बाइक चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून दरदिवशी शहरातील विविध पोलीस ठाण्यात ३ ते ५ दुचाकीचोरीच्या घटनांची नोंद होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उल्हासनगर पोलीस परिमंडळचे पोलीस उप-आयुक्त प्रषांत मोहिते यांनी विविध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, असे निर्देश दिले. त्यातच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी महिन्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास एपीआय खातीब करीत असतानाच चोरीला गेलेली हीच दुचाकी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळताच एपीआय खातीब पोलीस पथकासह जुन्नर येथे जाऊन ती दुचाकी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दुचाकी लंपास करण्यात माहीर असलेल्या आरोपी महादूचे नाव पुढे आले.
चोरलेली दुचाकी मूळगावी विकली अन्...
चोरीला गेलेली दुचाकी आरोपी महादुने त्याचे मूळगाव असलेल्या जुन्नर गावात विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून त्याला उल्हासनगरातून सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात आणखी दोन साथीदार असल्याचे सांगताच आरोपी धीरजलाही अटक केली. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
तिसरा आरोपी हाती लागला तर...
अटक दुकलीकडून आतापर्यंत लंपास केलेल्या विविध कंपन्यांच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. मात्र तिसरा आरोपी फरार असल्याने जर तो पोलिसांच्या तावडीत सापडला तर आणखी काही दुचाकीचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता मोहिते यांनी वर्तवली.