सोलापूर - रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. अशोक मंजुळकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महापालिकेच्या वतीने खोदण्यात आलेला खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच होता. तो खड्डा न भरल्यामुळे तरुणाचा नाहक बळी गेल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
सोलापूर-अक्कलकोट या प्रमुख रस्त्यावर महापालिकेच्यावतीने कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आलेला आहे. हा खड्डा मागील ३ महिन्यांपासून तसाच ठेवण्यात आल्यामुळे अपघातास आमंत्रण देणारा हा खड्डा ठरला आहे. आज दुपारच्या सुमारास अशोक मंजुळकर या युवकाचा या खड्ड्याने बळी घेतला. मंजुळकर हा दुचाकीवर जात असताना खड्ड्यात आल्यावर त्याचा तोल गेला आणि बाजूलाच जाणाऱ्या डंपरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. महापालिकेच्या बेफिकीर कारभारामुळे अशोक मंजुळकर याचा मृत्यू झाला आहे.
हा रस्ता सोलापूर शहरातील २ नामांकित कॉलेजकडे जाणार असून, या रस्त्यावरून दररोज हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात. याच रस्त्यावर अनेक अपघातही झाले आहेत. खोदण्यात आलेला खड्डा महापालिकेकडून योग्यवेळी भरण्यात न आल्यामुळे एका युवकाचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.