सोलापूर - महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमावादाचे पडसाद सोलापूरातही पहायला मिळाले आहे. सोलापूरातील यूवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहनच्या बसेसवर काळे फासून 'जय महाराष्ट्र' लिहत निषेध नोंदवला आहे. सोलापूर शहरातील क्रमांक दोनच्या बस स्थानकावर थांबलेल्या कर्नाटकच्या बसेसवर कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.
हेही वाचा... अजितदादांचा 'हा' विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवे. कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठीशी राहू, असे संतापजनक वत्कव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील याने केले होते. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पडसाद उमटत आहेत. सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील शास्त्रीनगर येथील क्रमांक दोनच्या एसटी डेपोत थांबलेल्या कर्नाटकातील एसटी बसेसच्या कर्नाटकी पाट्या आणि नंबर प्लेटला काळे फासण्यात आले. तसेच यावेळी बसेसवर जय महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, मराठी अस्मिता, युवासेना, ठाकरे सरकार असा मजकूर रंगवून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा... बाबांचे आशिर्वाद नेहमीच सोबत म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो - अमित देशमुख
कर्नाटक सरकारकडून सातत्याने मराठी बांधवांवर अन्याय केला जात आहे. अनेकदा मराठी बांधवांवर हल्लेसुद्धा झाले आहेत. आता तर भीमाशंकर पाटील यांनी तर चक्क मराठी बांधवांना गोळ्या घालून ठार मारा, असे विधान केले. असा अन्याय आणि धमकी महाराष्ट्र कधीसुद्धा सहन करणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकार, मुख्यमंत्री येडियुरप्पा व पाटील याच्या निषेधार्थ युवा सेनेच्यावतीने शांततेने आंदोलन करून पहिल्या टप्यात इशारा दिला आहे. यापुढचे आंदोलन 'न भूतो न भविष्यती' असे होईल, याची कर्नाटक सरकारने काळजी घ्यावी, असे यावेळी युवासेना शहराध्यक्ष विठ्ठल वानकर म्हणाले.