सोलापूर - मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी गर्दी केली. विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आणि रुख्मिणीला ओवसण्यासाठी संपूर्ण राज्यासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातूनदेखील भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. संक्रातीच्या सणासाठी मंदिराची फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला महिलांनी पहाटेपासून गर्दी केली होती. मंदिर समितीच्यावतीने रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांसाठी वेगळी व्यवस्था करून देण्यात आली. सात जन्मी हाच पती मिळू दे, शेतामध्ये चांगके पिक येऊ दे, राज्यातील सर्व शेतकरी सुखात राहू दे, असे विठ्ठल-रुक्मिणीकडे साकडे घातले असल्याचे महिलांनी सांगितले.
हेही वाचा - मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारीलाच का येतो?
नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांत हा महिलांचा सण असतो. या दिवशी भोगी करणे, वाण-ओवसा घेऊन मंदिरात ओवसायला जाणे, या परंपरा आजही जोपासल्या जातात. महिला वाण म्हणून आपल्या शेतामध्ये पिकवलेले धान्य देवाच्या चरणी वाहण्यासाठी आणतात.