सोलापूर - पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मायलेकरांना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे 6.30 वाजता बोंडले येथे घडली.
मृत माधुरी नवनाथ देशमुख (वय ३५ वर्षे ) या शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख (वय ११ वर्षे) याच्यासह मॉर्निंगवॉकसाठी पुणे-पंढरपूर पालखीमार्गावर गेल्या होत्या. दोघे वेळापूरच्या दिशेने चालत असतानाच पाठीमागून येणार्या मालवाहतुकीच्या ट्रकने दोघांनाही धडक दिली. माधुरी देशमुख या सातारा जिल्ह्यातील विखळे येथील रहिवासी आहेत.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रकचालकाने दोघांही धडक दिल्याने माधुरी देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलावर वेळापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माधुरी नवनाथ देशमुख या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी बोंडले येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांच्याकडे आल्या होत्या.
ट्रकचा पाठलाग करून गावातील तरुणांनी त्या ट्रकचालकास माळशिरस येथे पकडले. मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक नबिसा लाडलेसाहब पटेल (वय ३५) व क्लिनर मल्लिकार्जुन भिमराव धोरे (वय ४२ रा.रामामोला शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.