सोलापूर - एका 23 वर्षीय मुलाने 45 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना होटगी रोड परिसरात घडली आहे. नागदेवी गुरूपादय्या स्वामी असे खून झालेल्या महिलेचे नाव असून सैफअली अशरफ शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत नागदेवी या होटगी रोड परिसरातील मोहिते नगरमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांची आरोपी सैफअली याच्याशी ओळख होती. 27 जून रोजी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. तेव्हा आरोपी सैफअलीने नागदेवी यांचा गळा आवळून खून केला.
फिर्यादी विजय कुमार स्वामी हे 29 जून रोजी बहिण नागदेवी हिला पुण्याहून फोन करत होते. परंतु नागदेवीचा फोन लागत नसल्याने त्यांची चिंता वाढली. तेव्हा विजयकुमार स्वामी यांनी मोठ्या बहिणीला फोन करून नागदेवीबद्दल सांगितले. त्यानंतर 30 जून रोजी मृत महिलेच्या भाच्याने घरी जाऊन पाहिले असता, नागदेवी यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची विजयकुमार स्वामी यांना माहिती होताच, त्यांनी फोनवरून सोलापूर पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी जाऊन पाहिले असता नागदेवीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करत सर्व घराची झडती घेतली. यात नागदेवीचे दोन्ही मोबाईल नसल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले यात 27 जून रोजी सैफअली शेख हा सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नागदेवीच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
सैफअलीबद्दल अधिक चौकशी केली असता, तो कहकशा अपार्टमेंटमधील वॉचमनचा मुलगा असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता तो सोलापुरात नसल्याचे कळाले. तेव्हा विजापूर नाका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सैफअलीला गुलबर्गा येथून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खूनाची कबुली दिली. याबाबत अधिक तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे करत आहेत.