सोलापूर : भाच्याच्या गाडीवरुन माहेरी चाललेल्या मामीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्गावर हा अपघात झाला. रेश्मा दत्तात्रय सुतार (४०) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाचीवाडी(ता. माढा) येथून धनंजय सुतार हा त्याच्या मामीला माहेरी (गौडगाव, ता.बार्शी) दिवाळी निमित्त सोडवण्यासाठी दुचाकीवरुन जात होता. यावेळी माढा-वैराग मार्गावरील केवड आश्रमशाळेसमोरील गतिरोधकावरुन जात असताना रेश्मा यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर खाली कोसळल्या. त्या खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
अपघातानंतर माढा ग्रामीण रुग्णालयात रेश्मा यांना उपचारासाठी आणले असता, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रमोद बोबडे यांनी त्यांना मृत घोषित केले. रेश्मा यांच्या पश्चात आई, वडील, पती, दोन मुले, सासू सासरे, दीर आणि भावजयी असा परिवार आहे.
..तरच अपघाताच्या घटना टळतील
पत्नीला माहेरला सोडण्यासाठी, तसेच भाऊबीजेनंतर परत सासरी येताना मोठ्या प्रमाणात दुचाकींचा वापर केला जातो. यावेळी वाहने सावकाशपणे चालवून सुरक्षित ठिकाण गाठणे गरजेचे आहे.
अनेक जण गाडी चालवताना मोबाईलही वापरतात त्यामुळेदेखील अपघात होण्याचे प्रमाण वाढते. वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्वांनीच केले, तरच अशा अपघाताच्या दुर्दैवी घटना टळतील.
हेही वाचा : चेनस्नॅचिंग प्रकरणतील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; चौकशीत आणखी गुन्ह्यांचा खुलासा