पंढरपूर (सोलापूर) - कोरोना महामारीमुळे जास्त दिवस अधिवेशन घेणे धोकादायक आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला असून हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचे होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते चार डिसेंबर रोजी पंढरपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.
अधिवेशन जर पूर्णवेळ घेतले, तर गर्दीची शक्यता -
पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिनी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ते संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथे आले होते. यावेळी त्यांनी वारकरी मंडळींसोबत बैठकी घेतली. विधानसभा अधिवेशन पूर्णवेळ व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र, कोरोनामुळे पांडुरंगाची आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशन जर पूर्णवेळ घेतले, तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
..तर ऑनलाईन अधिवेशनाचा विचार होऊ शकतो -
अधिवेशन होणे गरजेचेच असून कमी कालावधीचे अधिवेशन हे लोकशाहीसाठी पोषक नाही. कोरोनाचा प्रार्दुभाव असाच राहीला तर, यावर तोडगा म्हणून, आमदारांना त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कक्षात बसून अधिवेशन घेता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रशासनाच्या संगनमताने होतो वाळू उपसा -
चंद्रभागेच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. हा प्रकार प्रशासनाच्या संगनमताने होत असून याबाबत प्रश्न विचारला असता, सात डिसेंबरपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे याबाबत मी कोणतेही आदेश देऊ शकत नाही. मात्र, त्यानंतर या सर्व विषयांवर मी आवर्जून लक्ष देऊन पाठपुरावा करतो, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.
शेतकऱ्यांची थट्टा कोणीही सहन करणार नाही -
सध्याच्या परिस्थितीमध्ये मी विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे कोणत्याही पक्षाची बाजू घेऊ शकत नाही. मात्र, लोकशाहीमध्ये जनतेचा कौल महत्त्वाचा असतो. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी यांनी पुढे येऊन बोलावे. आपला भारत देश कृषीप्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा कोणीही सहन करणार नाही, असेही त्यांना म्हटले.
हेही वचा - मुलीच्या संगोपनासाठी पत्नीकडूनच पैशाची मागणी; ठाण्यातील धक्कादायक प्रकार