सोलापूर - अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सोलापूर, मुंबई, पुणे यासह इतर विद्यापीठांमध्ये सर्व्हर क्रॅश झाला होता. यासाठी सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीकडून अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी पुढे येतील. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत जाणीवपूर्वक व्यत्तय आणणार्या दोषींवर गुन्हे दाखल करू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान मुंबईमध्ये सायबर क्राईमवर गुन्हा नोंद झाला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
आज पदवीधर मतदार संघाच्या अरूण लाड व शिक्षक मतदार संघाच्या जयंत आसगवाकर यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील हेरिटेज लॉन्स येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर उदय सामंत यांनी सदर विधान केले.
दोषींवर कारवाई होणार -
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधी जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार. तत्पूर्वी यासाठी सत्यशोधन समिती नेमली असून यामध्ये समिती प्रमुख यांनी महिन्याभरात अहवाल सादर केल्यानंतर पूर्ण माहिती कळेल. या प्रकरणात जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या परीक्षेत व्यत्यय आणणाऱ्यांवर राज्यपालांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. प्रसंगी दोषींवर एफआयआर दाखल करू, असेही सामंत म्हणाले.
सध्या कोणतेही महाविद्यालय सुरू करण्याचा विचार नाही -
२३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महाविद्यालय कधी सुरू होणार या विषयी विचारल्यास, हे सर्वस्वी त्या संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. मी राज्य व उच्च तंत्रशिक्षण मंत्री असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी कोणतेही महाविद्यालय सुरू करण्याचा विचार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - महादेव कोळी संघर्ष समितीचा बुधवारी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा; दशरथ भांडे यांची माहिती